संग्रहित फोटो
पुणे : नाष्टा करत असलेल्या एका तरुणावर जुन्या वादातून टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. तसेच, या तरुणानंतर आणखी दुसऱ्या तरुणावर वार करून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या टोळक्याने दहशत देखील माजविली. याप्रकरणी नितेश विनोद पवार (वय २४, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी बाजार) याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल मोहिते ऊर्फ बुरण्या, गणेश साळुंखे ऊर्फ छोट्या लोहार, नकुल गायकवाड अंश गोपनारायण ऊर्फ जंगल्या, आदित्य वाघमारे ऊर्फ ड्रँगो, तुषार राजेंद्र डोके ऊर्फ बबलु डोके, चाँद शेख, गौरव (सर्व रा. महादेववाडी, खडकी) व इतर४ ते ५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकी बाजार येथील अमृत मेडिकलसमोरील फुटपाथवर असलेल्या नाष्ट्याच्या दुकानाजवळ बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. या घटनेत नितेश विनोद पवार व राजु चौबे (रा. दर्गा वसाहत, खडकी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पवार टेम्पोचालक आहे तर, राजू चौबे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पवार व राजू चौबे हे फुटपाथवरील दुकानात नाष्टा करीत होते. आरोपींशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे असताना राहुल मोहिते व इतर जण तेथे आले. त्यांनी पवार याला पाहून धर धर त्याला आज मारुनच टाकू असे म्हणून शिवीगाळ करुन नकुल गायकवाडने पवार यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. अंश याने फरशी फेकून मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजू चौबे याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करुन दहशत माजवत निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : न्यायाधीशानेच जामीन देण्यासाठी मागितली लाच; वाचा संपूर्ण प्रकरण
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.