पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. चोरी, हत्या, हाणामारी अश्या अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहे. आता पुण्यातील सहकारनगर परिसरातून चोरीची एक घटना समोर आली आहे. मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून एक दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केली आहे. अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. वारजे भागातील रामनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अल्पवयीन मुलांनी सहकारनगर परिसरातून रिक्षा चोरली होती. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील मोकळ्या जागेत थांबला होता. त्याच्याकडे असलेली रिक्षा चोरीची असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली.
तीन गुन्हे उघडकीस
अल्पवयीनाने सहकारनगर, वारजे, हडपसर परिसरातून एक दुचाकी, दोन रिक्षा चोरल्याचे उघड झाले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, वर्षा कावडे, पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे, साईकुमार कारके, गणेश ढगे, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, नारायण बनकर, प्रदीप राढोट, निनाद माने यांनी ही कामगिरी केली.
सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला दिली धमकी
पुण्यातील उत्तमनगर परिसरातील एका महिलेची सायबर चोरट्यानी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचा अधिकारी तसेच पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून अटक करण्याची धमकी दिली व तिच्याकडून १० हजार रुपये उकळले. सुदैवाने पुढील रक्कम ट्रान्सफर करताना तांत्रिक अडचण आल्याने महिलेचे खाते रिकामे होण्यापासून वाचले आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर १६ ऑगस्टला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल आला. त्याने स्वतःचे नाव आर. के. चौधरी सांगून तो मुंबई येथील ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’ या कार्यालयात वरिष्ठ सल्लागार असल्याचे सांगितले. त्याने महिलेविरुद्ध तक्रार दाखल झाल्याचे सांगून त्याची खोटी कॉपीही दाखवली. नंतर दुसऱ्या व्यक्तीला कॉलमध्ये जोडून त्याने स्वतःची ओळख पोलिस उपनिरीक्षक संदीप रॉय म्हणून ओळख करून दिली व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. महिलेच्या आधारकार्डचा वापर करून फसवणुकीचे प्रकार झाले असून, तिच्या नावाने मुंबईतील कॅनरा बँकेतून अडीच कोटी रुपये इस्लामिक टेररिस्ट संघटनेला ट्रान्सफर झाल्याची बतावणी केली.