कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला (फोटो- टीम नवराष्ट्र)
कोल्हापूर: राज्यभरात पावसाने कहर केला आहे. राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोयना नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशाप्रकारे पाऊस झाला आहे, हे जाणून घेऊयात.
पाटगांव परिसरात मुसळधार पाऊस
भुदरगड तालुक्यातील पाटगांव येथील मौनी सागर जलाश यांच्या सांडव्यातून १२०० क्युसेक व विद्युत गृहातून ३५० क्युसेक असा एकूण १५५० क्युसेक प्रमाणात पाण्याचा विसर्ग पाटगांव मध्यम प्रकल्पातून होत आहे .यामूळे वेदगंगा नदीचे पाणी पाटगांवच्या बाजारपेठेत घुसले असून नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .दरम्यान पावसाचा जोर वाढला तर अनेक घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. पश्चिम भुदरगड परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.संततधार पावसामुळे पुन्हा एकदा सगळीकडे पाणीच पाणी झाले असून वेदगंगा नदीला पुराचा धोका वाढत चालला आहे.दरम्यान पाटगाव येथील लहान पूल ‘सुक्याची वाडी, निळपण ,म्हसवे , वाघापूर ,कोनवडे ,गारगोटी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
या परिसरात गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः कहर केला असून नदीकाठावरील हातातोंडांशी आलेल्या पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र वारे नसल्याने कोठेही मोठया प्रमाणात पडझड झालेली दिसून नाही. पाटगाव धरण क्षेत्रात मागील २४ तासात १६५ मि.मी.पाऊस, १जून पासून आज अखेर ५७०४ एकूण पाऊस झाला असून पाण्याची पातळी ६२६.६० मी.झाली आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्या द्वारे १५५३. ८५ विसर्ग चालू झाला आहे.त्यामुळे प्रांत अधिकारी हरेश सुळ व तहसीलदार अर्चना पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने नदिकाठावरील गावांना सुरक्षेचा इशारा देणेत आला आहे.तर सांडव्यातून पडणाऱ्या पाण्याबरोबर पाटगाव मध्यम प्रकल्पातील मोठे मासे देखील पडत असल्यामुळे पाटगाव परिसरातील नागरिक मासे पकडण्यासाठी गर्दी करत आहेत.दरम्यान जीव धोक्यात घालून सांडव्यामध्ये उतरू नये असे आव्हान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुनील पाटील व सहाय्यक अभियंता सुमित गुरव यांनी केले आहे.
Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
गडहिंग्लज उपविभागात सलग दोन दिवस धुवांधार पाऊस पडत असल्याने हिरण्यकेशी, घटप्रभा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. नद्यांना पूर आला आहे. गडहिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील भडगाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दक्षिणेकडील भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासन सतर्क बनले आहे. गडहिंग्लज, आजरा चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. चित्री, फाटकवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हिरण्याकेशी, घटप्रभा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे, पूर परिस्थिती निर्माण झाल्याने बहुतांशी गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गडहिंग्लज शहरातील नदीवेस भागात पाणी आल्याने गडहिंग्लज नगरपालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित बनले आहे. गडहिंग्लज काळभैरी मंदिर बड्याचीवाडी मार्गावर पाणी आले आहे . या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
करवीर-पश्चिमला पुराच्या पाण्याचा वेढा
गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर सह पश्चिम करवीर भागात पावसाने दणका दिला असून पुराचा वेढा पडला आहे. गेल्या दोन दिवसात पावसाने परत एकदा जोरदार सुरुवात केली आहे. पावसाची संततधार सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुळशी नदीवरचे सात बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले असून ३० गावांचा संपर्क तुटला आहे प्रवाशाला पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने खूपच उसळी घेतली असून राधानगरी व तुळशी धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. भरलेल्या प्रत्येक धरणातून पाचशे ते एक हजारच्या वर अधिक क्युसेस पाणी नदीपत्रात सोडण्यात आले आहे. प्रशासनाकडून नदीकडच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी नदीपात्राकडेला केलेले अतिक्रमण हे देखील पुराला कारणीभूत आहे. नदीकाठची सर्व पिके पाण्याखाली गेल्याने पुराच्या पाण्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
कागल तालुक्यात जनावरांच्या गोठ्यांच्या भिंतींची पडझड