एटीएममधून पैसे काढणाऱ्या महिलेची फसवणूक; तब्बल 80 हजारांना घातला गंडा
पुणे : राज्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणूकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शिवाजीनगर भागातील एका एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी खात्यातून ८० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार दौंडमध्ये राहतात. त्या पुण्यात कामानिमित्त आल्या होत्या. शिवाजीनगर येथील वीर चापेकर चौकातील एटीएमध्ये पैसे काढण्यास गेल्या होत्या. तेव्हा चोरटा एटीएम केंद्रात शिरला. त्याने मदतीच्या बहाण्याने महिलेकडून एटीएम कार्ड घेतले. सोबत त्यांचा पासवर्डही घेतला. पण, तुमच्या खात्यातून पैसे निघत नसल्याचे सांगितले व हातचालाखी करून दुसरेच कार्ड त्यांना परत दिले. तक्रारदार एटीएम मशिनमधून बाहेर पडल्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यातून ८० हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात गुंतवणूकीच्या आमिषाने दोघांची फसवणूक; तब्बल 66 लाखांना घातला गंडा
एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना गंडा
एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या वाकडेवाडी येथील बनावट कॉल सेंटर’चा पर्दाफाश करीत शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडे पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के मिळून आले असून १५ मोबाईल, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांचे बँक खाती, चेक बुक मिळाले आहेत. आरोपींनी एलआयसीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले होते. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.