संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणूकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शेअर बाजारातत गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची ६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार वडगाव शेरी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारात गुंतवणूकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. तक्रारदाराला चोरट्यांनी सुरुवातीला परतावा दिल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात ४६ लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत. तसेचं शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी आणखी एका तरुणाची २१ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण…
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.