Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव-छत्रपती संभाजीनगर (Jalgaon- Chhatrapati Sambhajinagar) राष्ट्रीय महामार्गावरील हिवरखेडा फाट्याजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील जागेतील बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर मोरे यांचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ज्ञानेश्वर मोरे व त्यांचा मुलगा यश मोरे हे दोघे दुचाकीने पहरकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या बाळू उत्तम जोशी व अन्य दोघांनी (रा. कुंभारी) कार क्रमांक एमएच १९ ईए १७६९ ने पाठलाग केला. हिवरखेडा फाट्याजवळ कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तर यश हादेखील गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनीही तपासाबाबत सूचना केल्यात.
घटनेतील संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बाळू उत्तम जोशी यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
पुढील तपास पाहूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे करीत आहेत. मयत ज्ञानेश्वर मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोरे यांच्या मृत्यूमुळे कुंभारी बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून, या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






