Wildlife Waterholes: वन्यप्राण्यांच्या पाणवठ्यांवर लाखोंचा खर्च! अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रातील पाणवठा कोरडा; चौकशीची मागणी
Wildlife Waterholes: वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून पाणवठे उभारले जातात; मात्र प्रत्यक्षात त्याच पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याचे चित्र सांगोला तालुक्यातील अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रात समोर आले आहे. वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली होणाऱ्या खर्चाचे वास्तव या कोरड्या पाणवठ्यामुळे उघड झाले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात असेल, तर त्याचा प्रत्यक्ष विनियोग झाला आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. टँकरच्या फेऱ्यांची नोंद, वाहनांचे लॉगबुक, पाणीपुरवठ्याच्या पावत्या आणि प्रत्यक्ष खर्च यांची पडताळणी करावी. पाणवठा कोरडा असताना टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे दाखवून बिले काढली आहेत का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रातील पाणवठ्याची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. पाणवठ्याच्या निर्मितीपासून झालेल्या खर्चाची आणि पाणीपुरवठ्याच्या नोंदींची स्वतंत्र चौकशी करावी. अनियमितता आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
वनक्षेत्रातील झाडांची सुरक्षा, वन्यप्राण्यांचे संरक्षण, अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण आणि पाणवठ्यांची देखभाल ही वनविभागाची जबाबदारी आहे. मात्र, वनपाल आणि वनरक्षक गावाकडे तसेच वनक्षेत्रात नियमित फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करीत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वनक्षेत्रात पाहणी करतात का? त्यांच्या गस्तीच्या नोंदी काय आहेत? वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था कोण पाहणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून सांगोला तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याची चर्चा आहे.
अजनाळे-लिगाडेवाडी परिसरात तब्बल ३१२ हेक्टर वनक्षेत्र असून या भागात काळवीट, कोल्हे, लांडगे, मोर, ससे यांसह विविध वन्यप्राण्यांचा वावर आहे. या वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी लाखो रुपये खर्चुन पाणवठा तयार करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणवठा तयार झाल्यापासून त्यामध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. प्रत्यक्ष छायाचित्रातही पाणवठा कोरडा असल्याचे दिसत आहे.
वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही वनविभागाची जबाबदारी असताना पाणवठा उभारून त्यात पाणीच नसेल, तर या कामाचा उपयोग काय? केवळ बांधकाम करून वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी संपते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. विशेषतः पाणीटंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल, तर लाखो रुपयांचा खर्च नेमका कोणत्या कामासाठी केला जात आहे, याचे स्पष्टीकरण वनविभागाने द्यावे, अशी मागणी होत आहे.






