सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पुणे : पुण्यासह देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात तब्बल साडेपाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात केतन अग्रवालच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला, हत्या कशी करण्यात आली आणि संबंधित व्यक्तींच्या पार्श्वभूमीचा तपास कसा करण्यात आला, याची माहिती देण्यात आली आहे. तपासादरम्यान सिया गोयलच्या शाळेतील जुन्या प्रेमप्रकरणाचे धागेदोरेही पोलिसांनी तपासल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल दहावीत असताना तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. सियाचे नंतर चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर त्या मुलाने तिच्याशी संबंध तोडल्याचे सांगण्यात आले. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान या माजी प्रियकराचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्याने सियासोबतच्या जुन्या संबंधांबाबत माहिती दिल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलाच्या लग्नाच्या तयारीबाबतही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील वेस्ट इन हॉटेलमध्ये गोयल आणि अग्रवाल कुटुंबीयांची भेट झाली. यावेळी केतन आणि सिया यांचा रोका विधी झाला. या वेळी सियाला २८ ड्रेस देण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील रिट्ज-कार्लटन हॉटेलमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. यावेळी सियाला सुमारे ८० लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने दिल्याचे विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले.
केतन हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या लग्नासाठी मोठी तयारी सुरू होती. लग्नासाठी चार ते पाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असल्याचेही विशाल अग्रवाल यांनी जबाबात सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे लग्नासाठी आलिशान रिसॉर्ट बुक करण्यात आले होते. या बुकिंगसाठी रिसॉर्ट मालकाला २५ लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. केतनच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी आर्थिक व्यवहार, कौटुंबिक संबंध, जुन्या प्रेमसंबंधांसह विविध बाबींचा तपास केला. या सर्व तपासातून समोर आलेल्या माहितीचा समावेश साडेपाच हजार पानी आरोपपत्रात करण्यात आला आहे.






