अपहरण झालेल्या बालकाची दोन तासात सुटका (File Photo : Kidnapped)
पिंपरी : बुलढाणा येथील एक दाम्पत्य आपल्या आठ वर्षीय मुलाला घेऊन रोजगारासाठी काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यांच्याच गावातील एका ओळखीच्या व्यक्तीने सोमवारी (दि.31) सायंकाळी पाच वाजता मुलाचे अपहरण केले. मात्र, खंडणी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून भुसावळ पोलिस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलिस, भुसावळ रेल्वे स्टेशन या ठिकाणी संपर्क करून आरोपीला जेरबंद करत अपहृत मुलाची सुटका केली.
गजानन सुपडा पानपाटील (२५, रा. पुनई, जि. बुलढाणा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अपहरणाप्रकरणी आठ वर्षीय मुलाच्या आईने मंगळवारी (दि.1) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील एक दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आपल्या आठ वर्षीय मुलासह पिंपरी चिंचवड शहरात कामासाठी आले होते. आरोपी गजानन हा अपहृत मुलाच्या वडिलांच्या भावाचा मित्र आहे.
आरोपी गजानन हा देखील शहरात कामाच्या शोधात आला होता. मात्र, त्याला काम मिळाले नाही. हे पती-पत्नी दोघे कामाला जात होते. त्यांचा आठ वर्षीय मुलगा हा घरीच राहत होता. त्यावेळी आरोपी त्याच्याशी जवळीक साधत असे. मुलाला काही खाद्यपदार्थ खायला देत होता. एकदा त्याने मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या आईने मुलाला त्याच्या तावडीतून सोडविले.
दरम्यान, 31 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने मुलाचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच खंडणी विरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आरोपीचा फोटो आणि मोबाईल नंबर प्राप्त केला. तांत्रिक विश्लेषण केला असता आरोपी अपहृत मुलाला रेल्वेने घेऊन जात असल्याचे निदर्शनात आले. त्यानुसार, भुसावळ पोलिस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलिस, भुसावळ रेल्वे स्टेशन, मुक्ताईनगर, जळगाव, चाळीसगाव पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची शहानिशा
सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीची शहानिशा करत काशी एक्सप्रेसमध्ये बसलेल्या आरोपीला ताब्यात घेत अपहृत बालकाची सुटका केली. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील बदाने, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, ज्ञानेश्वर कुराडे यांनी चाळीसगाव पोलिस ठाणे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची मुलाच्या आईवर वाईट नजर…
आरोपी गजानन याची फिर्यादी महिलेवर वाईट नजर होती. फिर्यादी महिलेचे दुसरे लग्न झाले आहे. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. तो आई आणि सावत्र वडिलांबरोबर राहत आहे. आरोपी या मुलाच्या सावत्र वडिलांच्या भावाचा मित्र आहे. त्याची फिर्यादी महिलेवर वाईट नजर होती. त्याने तिच्याकडे शरिरसुखाची मागणीही केली होती. तसेच मुलगा मला दे, मी तुला ५० हजार, एक लाख रुपये देतो, असेही सांगितले होते.
अपहरणाचे कारण अद्याप अस्पष्ट
आरोपी गजानन याने आठ वर्षे मुलाचे नक्की कोणत्या कारणासाठी अपहरण केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रथमदर्शनी मुंबई येथे मुलाची विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता, असा अंदाज बांधला जात आहे. आठ वर्षीय मुलाचे अपहरण होणे ही खूपच गंभीर गोष्ट असल्याने खंडणी विरोधी पथकाने खूपच संवेदनशीलपणे या प्रकरणाचा तपास केला आहे.
– देवेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक