Crime News Live Updates
28 Aug 2025 01:40 PM (IST)
गडचिरोलीत नक्षलवाद्यां विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गडचिरोलीत चार नस्खलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यावेळी पोलिसांना शस्त्रसाठा सापडला असून अजूनही चकमक सुरु आहे. ही कारवाई भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात सुरु आहे.
28 Aug 2025 01:20 PM (IST)
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आधी स्वतःच्या ४ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला नंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणातून या व्यापारी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांनी मुलाला विषारी पदार्थ खायला दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली असून घटनास्थळी त्यांना एक सुसाईड नोट भेटली.
28 Aug 2025 01:05 PM (IST)
जर्मनीत हॉटेल व्यावसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ५४ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण कुमार त्रिवेदी (रा. कांताकुंज, गुजरात), चंद्रेश त्रिवेदी, जानव्ही चंद्रेश त्रिवेदी (दोघेही रा. साल्सबर्गर स्ट्रिट, जर्मनी), निती पांडेय, तृप्ती नितीन पांडेय (२८, दोघेही रा. वल्लभनगर, इंदोर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हरदीपसिंग अमोलकसिंग होरा (५४, रा. सायकल मर्चंट हौंसिंग सोसायटी, रास्तापेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२४ ते २० मे २०२५ दरम्यान घडला.
28 Aug 2025 12:42 PM (IST)
पुणे शहरातील नामांकित हॉटेल 'पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट'चे मालक संतोष शेट्टी (४५) यांचा त्यांच्याच हॉटेलातील कामगार याने रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा घडली. किचनमधला चाकू आणत तो अचानक त्यांच्या पोटात घुपसून व वारकरून खून केला. बेसावध असल्याचे पाहून त्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (३९) याला ताब्यात घेतले आहे.
28 Aug 2025 12:22 PM (IST)
मध्यभागातील म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दारू आणि वाईन शॉपीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील पारित केले होते. मात्र, निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने पूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत. त्यानूसार सुधारित आदेश काढण्यात आला आहे.
28 Aug 2025 11:51 AM (IST)
बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून, मृत तरुणाचे नाव अविनाश शंकर देवकर (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
28 Aug 2025 11:31 AM (IST)
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. नागरिकांनी केलेलं मतदान मतमोजणी प्रक्रियेदरम्यान चोरीला जात असल्याच्या राहुल गांधीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहेत. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंब्र्यातील गणेशघाट खाडीपरिसरात मोठ्या संख्येने मतदान कार्ड फेकलेले आढळून आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एका पिशवीत जास्तीच्या संख्येने मतदान कार्ड फेकल्याचं आढळून आलं. या प्रकरणा ने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड का फेकली आणि हे नेमकं कोणी केलं याबाबत अद्यापतरी ठोस माहिती नाही.
उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.