कामगारावर जीवघेणा हल्ला (फोटो- istockphoto)
शिक्रापूर: सणसवाडी ता. शिरुर येथील ओंकार पेट्रोलपंप येथे दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या युवकांना सिगारेट बाहेर जाऊन प्या असे म्हटल्याने चौघांनी पेट्रोल पंपच्या दोन कामगारांवर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केला. त्यानंतर काठीने मारहाण केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिकेत सुनील गायकवाड, दत्ता अशोक सोमवंशी, अरमान मजार खान व प्रसन्ना बडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी ता. शिरुर येथील ओंकार पेट्रोलपंप वरील कामगार दयानंद सरोदे व महादेव सरोदे दोघे पेट्रोलपंपवर असताना एम एच १२ एम डब्ल्यू ११९९ या दुचाकीहून दोन युवक मद्यधुंद अवस्थेत हातात पेटवलेली सिगारेट घेऊन आल्याने दयानंद याने येथे पेट्रोल चालू आहे. येथे सिगारेट चालणार नाही, असे म्हणत सिगारेट बाजूला केल्याने दोघेजण दमदाटी करत निघून गेले.
मात्र काही वेळाने एम एच १२ एम डब्ल्यू ११९९ व एम एच १२ एस व्ही ३३४७ या दोन दुचाकीहून चौघेजण काठ्या व कोयता घेऊन आले. त्यांनी इंद्रजीत व महादेव यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत कोयत्याने तोंडावर वार करत जखमी केले. सदर घटनेत दयानंद इंद्रसेन सरोदे व महादेव इंद्रसेन सरोदे हे दोघे जखमी झाले असून याबाबत दयानंद इंद्रसेन सरोदे वय ३६ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अनिकेत सुनील गायकवाड रा. वाडागाव ता. शिरुर जि. पुणे, दत्ता अशोक सोमवंशी रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे, अरमान मजार खान रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, प्रसन्ना बडे रा. पेरणे ता. हवेली जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार दामोदर होळकर हे करत आहे.