Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करून तिच्या आई वडिलांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठजी सुनावली आहे. वैष्णवीच्या सासरे, दीर हेदेखील फरार होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, पण निलेश चव्हाण गेल्या दोन आठवड्यांपासून फरारच होता. काल त्यालाही अटक करण्यात आली. पण निलेश चव्हाण पोलिसांना का सापडत नव्हता, याचे कारणही समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण फरारा होता. त्याने फोनही बंद ठेवला होता, त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता, पण फरार होण्यापूर्वी निलेशने त्याच्या मैत्रिणीला फिरायला जाऊया, असं सांगत सोबत घेतलं आणि तिला घेऊन तो दिल्लीला गेला. पण त्याचवेळी त्याने त्याचा फोनही बंद ठेवला होता. त्याने प्रत्येकवेळी मैत्रिणीच्या फोनचा वापर केला. त्याच्या मैत्रिणीला वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे तिनेही चव्हाणला मदत केली. पण निलेश एका विशिष्ट व्यक्तीशी संपर्क साधणारच असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरूवात केली. निलेशने त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून त्या व्यक्तीला संपर्क केला. त्यावेळी तो दिल्लीतच होता. निलेशच्या फोनवरून तो दिल्लीत असल्याचे पोलिसांना कळून आले.
दिल्लीतून निलेशने त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला परत पुण्यास जाण्यासाठी सांगितले. तो स्वत: गोरखपूरच्या बसमध्ये बसला. गोरखपूरमार्गे त्याचा नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन होता. पोलिसांनी निलेशच्या मैत्रिणीला ताब्यात घेत तिची चौकशी केली. तिच्या चौकशीतून तिला वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत माहिती नसल्याचे आणि या प्रकरणाशी तिचा कोणता संबंध नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांना निलेश चव्हाणच्या खासगी बसविषयी माहिती मिळाली आणि पोलिसांनी नेपाळच्या सीमेवर बेड्या ठोकल्या.
निलेश चव्हाणने पोलिसांना चकवा देण्यासाठी नेपाळमध्ये पलायन करण्याचा नियोजनपूर्वक प्लॅन तयार केला होता. पोलिस मोबाईल ट्रेसिंगद्वारे आपली माहिती मिळवू शकतात, याची जाणीव असल्याने त्याने स्वतःचा फोन बंद ठेवला. तसेच, पुण्याहून रवाना होताना त्याने चार-पाच मोबाईल फोन आणि वेगवेगळी सिम कार्ड्स जवळ ठेवली. यासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड्स त्याने आपल्या मित्रांकडून घेतली होती. नेपाळमध्ये पोहोचल्यावर तिथले सिम कार्डही त्याने खरेदी केले. ऑनलाईन व्यवहारांमुळे पोलिसांना आपले ठसे सापडू शकतात, याची भीती असल्याने त्याने पुणे सोडण्यापूर्वी लाखो रुपयांची रोकड आपल्या जवळ ठेवली. स्वतःच्या वाहनाने प्रवास केल्यास ओळख पटू शकते, हे लक्षात घेऊन त्याने खासगी वाहन किंवा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास केला.