Bhayandar Murdha Village illegal construction demolition :
भाईंदर : भाईंदर पश्चिमेतील मुर्धा गाव परिसरात एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने १०० हून अधिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याचे समोर आले आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षारक्षक, पोलिसांची वाहने तसेच महापालिका परिवहन विभागाच्या बसही घटनास्थळी आणण्यात आल्या होत्या. एका बांधकामावरील कारवाईसाठी एवढा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान विरोध होण्याची शक्यता असल्याने महापालिकेकडून पोलिस बंदोबस्ताची मागणी केली जाते. त्यानुसार पोलिस विभागाकडून तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळाचे प्रमाण आणि बंदोबस्ताचा कालावधी यानुसार शुल्क आकारले जाते. त्यामुळे मुर्धा येथील कारवाईसाठी १०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्याने या बंदोबस्तावर महापालिकेचा किती खर्च होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुर्धा परिसरातील जुन्या बांधकामांच्या जागी नवीन बांधकामे उभारली जात असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आहेत. या बांधकामांना महापालिकेची मंजुरी नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मागील आठवड्यात याच परिसरातील एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये वाद झाला होता.
या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली १०० हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेकडून बांधकामांना परवानगी मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी उभारलेल्या घरांवर राजकीय द्वेषातून कारवाई केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. मात्र, अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बुधवारी पुन्हा या बांधकामावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. मागील कारवाईदरम्यान झालेला विरोध लक्षात घेऊन यावेळी जवळपास १०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. कारवाईला विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची वाहने तसेच महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसही घटनास्थळी आणण्यात आल्या होत्या.पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले की, मागील वेळी याच ठिकाणी वाद झाला होता. त्यामुळे यावेळी महापालिका प्रशासनाच्या मागणीनुसार मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मीरा-भाईंदर शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने येत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर एका बांधकामावरील कारवाईसाठी १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, वरिष्ठ अधिकारी, सुरक्षारक्षक, पोलिस वाहने आणि महापालिका बस असा मोठा फौजफाटा तैनात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तावर महापालिकेचा नेमका किती खर्च होणार, बंदोबस्तासाठी किती मनुष्यबळ मागवण्यात आले आणि त्यासाठी पोलिस विभागाकडून किती शुल्क आकारण्यात येणार, याची माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही होत आहे.






