फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पुणे: लुटमारीच्या उद्देशाने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार मुळशी तालुक्यात समोर आला आहे. दुधाळे वस्ती येथून बेपत्ता झालेल्या महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६, मूळ रा. छत्तीसगड) या तरुणाचा मृतदेह लवळे येथील शेडगेवस्तीजवळील तळजाईदेवी मंदिराच्या तळ्यात आढळून आला. या प्रकरणाचा तपास करत बावधन पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. महेंद्रकुमार बंजारे हा दुधाळे वस्ती येथे राहत होता. ३० ऑगस्टच्या रात्री तो अचानक घरातून बेपत्ता झाला. तो घरी परत न आल्याने त्याच्या २२ वर्षीय पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी लवळे येथील शेडगेवस्तीजवळील तळजाईदेवी मंदिराच्या तळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे हात-पाय टी-शर्टच्या सहाय्याने बांधलेले असल्याचे दिसून आले. तसेच मृतदेह पाण्यावर तरंगू नये, यासाठी पायाला वजनदार दगड बांधण्यात आला होता. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय बळावला.
पोलिसांनी तपासाची दिशा बदलून आरोपींचा शोध सुरू केला. तपासात लुटमारीच्या उद्देशाने महेंद्रकुमार याचा खून केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गोपाल ऊर्फ राज साधन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, दिल्ली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी लुटमारीच्या उद्देशाने महेंद्रकुमारला लक्ष्य केले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो तळ्यात फेकण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये आणि तो पाण्यावर तरंगू नये, यासाठी हात-पाय बांधून पायाला दगड बांधण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
हेही वाचा: Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत
या प्रकरणातील लुटीची रक्कम जप्त करणे, गुन्ह्यात वापरलेली साधने शोधणे तसेच हत्येतील अन्य आरोपीची भूमिका स्पष्ट करणे बाकी असल्याने पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी गोपाल बिस्वास याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्याबरोबरच हत्येचे नेमके कारण, लुटीची रक्कम आणि गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास बावधन पोलीस करीत आहेत.






