सौजन्य फोटो - AI Gemini
सोलापूर : दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. तुळशी गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत असून, वारंवार मागणी आणि आंदोलने करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी थेट गावच ‘विक्रीला’ काढले असून, संपूर्ण गावात ‘गाव विकणे आहे’ असे फलक लावण्यात आले आहेत.
हेही वाचा: Crime News: दुर्गापूजा प्रकरणात माजी मंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड; ५०-६० कोटींच्या व्यवहाराची चौकशी
तुळशी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाचा मोठा फटका शेतीला बसला असून अनेक शेतजमिनी पाण्याअभावी पडून आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे गावातील रोजगाराच्या संधींवरही परिणाम झाला असून, तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील पाणीटंचाईचा सामाजिक परिणामही आता समोर येत आहे. शेतकरी नारायण कुलकर्णी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे १५ एकर शेती असूनही पाण्याअभावी ती पडून आहे. गावात पाणी नसल्याने हाताला काम मिळत नाही आणि तरुण बेरोजगार होत आहेत. पाणीटंचाईमुळे गावातील ५०० हून अधिक मुलांची लग्ने जुळत नसल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचा: Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
पाणीप्रश्नाबाबत नाराजी व्यक्त करताना ग्रामस्थ बापू दगडे म्हणाले, “आमच्या गावावर देव इतका का कोपलाय, समजत नाही. आता तर दुसऱ्या गावी जाऊन आपल्या गावाचे नाव सांगायलाही लाज वाटत आहे.” पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांना थेट गाव ‘विक्रीला’ काढण्याची वेळ आल्याने परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. आता शासन आणि प्रशासन तुळशी गावाच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






