पुणे सायबर क्राईम (फोटो- टीम नवराष्ट्र/istockphoto)
पुणे/अक्षय फाटक : सायबर गुन्ह्यांचा आकडा मोठा असला तरी स्मार्ट सिटी, आयटी हब व शिक्षणाच्या माहेर घरातील पुणे पोलिसांची कामगिरी ‘सुमार’ आहे. उलटपक्षी पुण्याच्या दृष्टीने नुकतेच स्वतंत्र आयुक्तालय स्थापन होऊन काम करणारे पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस पुण्यापेक्षा ‘सरस’ कामगिरी करत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. यंदाच्या आकडेवीराचा लेखाजोखा पाहिला असता तुलनात्मकरित्या हे स्पष्ट दिसून आले आहे.
सायबर गुन्ह्यात जिल्ह्यातील ६५ हजारहून अधिक नागरिकांना जाळ्यात ओढून ११०० कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. चालू वर्षात शेअर मार्केट, गुंतवणूक, पॉलिसी फ्रॉड, ऑनलाईन कामकाज, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड, फिशींग कॉल, लिंकद्वारे फ्रॉड, फेक नावाने कॉल तसेच डेबीड, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड व ओटीपी शेअरद्वारे झालेले फ्रॉड, सेक्सस्टॉर्शन आणि इतर सायबर फ्रॉड यामध्ये सर्वाधिक फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी लोन अॅप, सेक्सस्टॉर्शनमध्ये सर्वाधिक फसवणूक झाली होती. दरवर्षी मोडस बदलून सायबर चोरटे नागरिकांना गंडा घालतात. गेल्या काही महिन्यांपासून डिजीटल अॅरेस्ट व पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळले आहे किंवा तुमच्या कागदपत्र व मोबाईल क्रमांकाचा वापर हा गैरव्यवहारासाठी झाला आहे, असे सांगत पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूक करत आहेत.
वर्षाला सायबर गुन्ह्यांचा आकडा वाढत असला तरी ते गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र अत्याल्पच आहे. कमी मनुष्यबळ, आधुनिक सामग्री तसेच सोयीसुविधा कमी असताना पोलीस काम करतात. परंतु, तरीही पुणे व पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या तुलाना केली, तेव्हा पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडे पोलीस सरस ठरत असल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दीड ते दोन महिन्यांपुर्वी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू झाले आहे. त्यात ९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ७ गुन्हे उघडकीस आणत ८२ आरोपींना पकडले आहे. तर पुणे सायबर पोलिसांकडे जवळपास २०० गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील १८ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. या १८ गुन्ह्यात २६ आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यातील गुन्हेगार “अज्ञात” आहेत असेच म्हणावे लागेल.
पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हे
सायबर पोलीस ठाणे- ९ गुन्हे दाखल
एकूण गुन्हे दाखल– २८४ नोंद
सायबर पोलिसांकडून ३० गुन्हे उघड, ८२ आरोपी अटक
महिन्याला सरासरी दोन ते अडीच हजार तक्रारी
एकूण फसवणूक रक्कम– ४३० करोड
पुणे पोलीस सायबर गुन्हे
सायबर पोलिसांकडे एकूण दाखल गुन्हे—१३७०
सायबर पोलिसांकडे तपासावरील गुन्हे- १९४
इतर स्थानिक पोलिसांकडे दाखल गुन्हे- ११७६
सायबर पोलिसांकडून उघड गुन्हे- १८ व २६ आरोपी अटक
एकूण फसवणूक रक्कम- ६७० करोड