File Photo : Crime
हिंगोली : शहरातील प्रगतीनगर भागात पोलिस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून खून केल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, खूनाचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime News: पुण्यात चाललंय तरी काय? घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन आरोपींना पोलिसांकडून अटक
वसमत पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याने पिस्टलमधून पत्नी मयुरी विलास मुकाडे यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर सासू वंदना धनवे व मेहुणा योगेश धनवे यांच्यावर गोळीबार केला. यात वंदना व योगेश गंभीर जखमी झाले तर मयुरी यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिस अधिकारी…
या घटनेतील जखमी वंदना व योगेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मयुरी यांचा मृतदेह घटनास्थळी पडून होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट
याबाबत पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी मुकाडे यांचा मृतदेह घरात पडलेला दिसून आला. वंदना धनवे व योगेश धनवे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विलास हा पळून गेला असता पोलिसांनी रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस सर्व बाजूंनी माहिती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोपी हत्या करण्यापूर्वी आला होता वसमत ठाण्यात
या प्रकरणात गोळीबार करणारा पोलिस कर्मचारी विलास हा हिंगोली तालुक्यातील गाडीबोरी येथील रहिवासी असून, 2014 मध्ये पोलिस दलात भरती झाला होता. त्यानंतर तो मुख्यालयात कर्तव्यावर होता. तर एका वर्षापूर्वीच त्याची वसमत शहर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. बुधवारी सकाळी तो पोलिस ठाण्यात आला होता, अशी माहिती वसमत शहर पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: “…तर मी काही करू शकत नाही”; CM फडणवीसांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचे विधान