
बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; पाच बांगलादेशी महिलांना पकडले
पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरातून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलांना पकडल्याचे सातत्याने समोर येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्यास राहत काही महिला देहव्यापार करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशातच आता बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवत पाच बांगलादेशी महिलांना पकडले आहे. सातत्याने या भागातून बांगलादेशी महिलांना महिलांना पकडून कारवाई केली असून, गेल्या काही दिवसांमधील ही चौथी कारवाई आहे.
सकीना खातून (वय २६), मोनिका अल्ताफ शेख (वय २८), परवीन जोहरमुल्ला शेख (वय ३५), हबीब अब्दुल शेख (वय २४), इसरात जनस सलमान शेख (वय २३) अशी पकडलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, फरासखाना पोलिसांना बुधवार पेठेतील माचीस बिल्डिंग परिसरात काही बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पथकाने सोमवारी पहाटे एक ते सकाळी नऊ वाजेपर्यंत विशेष मोहीम राबविली. पोलिसांनी छापा टाकून येथून पाच महिलांना ताब्यात घेतले.
चौकशीत या महिला बांगलादेशातून बेकायदेशीररित्या सीमा ओलांडून भारतात आल्याचे निष्पन्न झाले. त्या बुधवार पेठ परिसरात देहव्यवसाय करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. शहरातील बुधवार पेठ परिसरात वारंवार अशा प्रकारे बांगलादेशी महिला सापडत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील
गेल्या काही दिवसाखाली बुधावर पेठेतील दाणे आळी येथील न्यु वेलकम तसेच बेगम या इमारतीतील चार फ्लॅट पोलिसांनी एकाचवेळी सील केले आहेत. एक वर्षासाठी हे प्लॅट सील करण्यात आले आहेत. यासोबतच बेकायदेशीर पुण्यात आलेल्या व वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना देखील पुणे पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.