सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे (वय 25) असे आरोपीचे नाव असून, महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अश्लील फोन कॉल करणे आणि अनुचित संदेश पाठवणे या आरोपाखाली सायबर पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले आहे. अमोल काळे गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेज करुन त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली आहे.
नोडल सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. भामरे हे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी संशयिताचे स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं.
दरम्यान आरोपी काळे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळेला ताब्यात घेतले आणि अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे याने आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचे कबूल केले.