Crime News Live Updates
12 Sep 2025 01:05 PM (IST)
एक धक्कादायक प्रकार अकलूजमधून उघडकीस आला आहे. अकलुज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. या घटनेमुळे अकलुज, सातारा व रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
12 Sep 2025 12:40 PM (IST)
पुणे-सोलापूर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले आहे. तर एकजण पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याला पकडण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. मंगळवारी (ता.०९) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आंद्रे वस्ती,सार्वजनीक रोडचे कडेला, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर,ता.हवेली) परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गणेश रावसाहेब गोडसे,(वय २५,रा.आंद्रे वस्ती, लोणी काळभोर पुणे,मुळगाव सोनेवाडी, ता.सांगोला,जि.सोलापुर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तर अक्षय रवि पवार (रा.लोणी काळभोर,ता.हवेली)असे फरार आरोपीचे नाव आहे. आरोपी गणेश गोडसे याच्या ताब्यातुन पोलिसांनी २२ हजार रुपये किमतीचा ११०४ ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेली २ लाखांची चारचाकी गाडी असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
12 Sep 2025 12:20 PM (IST)
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाच्या झालेल्या खून प्रकरणात गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह ४ जणांना सोमवारी रात्री बुलढाणा येथून जेरबंद केले. टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (६८, रा. नाना पेठ) हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. आयुषच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली असून, आंदेकरच्या ताबेमारी अथवा अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून महापालिकेला लवकरच पत्र पाठवले जाणार आहे.
12 Sep 2025 11:56 AM (IST)
मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसाखाली ओबीसी समाजाने बारामतीत मोर्चा काढला होता. विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश लागू केल्याने, या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसींच्या वतीने प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरातून निषेध मोर्चा प्रांत कार्यालयावर काढण्यात आला होता. दरम्यान ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याने, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाने आंदोलकांना पत्र देखील दिले होते. मात्र पोलीस प्रशासनाचा आदेश डावलून बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर, भाजपचे ॲड जी. बी गावडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सचिव काळुराम चौधरी, पांडुरंग मेरगळ, बापुराव सोलनकर, नवनाथ पडळकर, चंद्रकांत वाघमोडे, बापुराव सोलनकर, राष्ट्रवादीचे किशोर मासाळ, गोविंद देवकाते, ॲड मंगेश ससाणे, किशोर हिंगणे, विठ्ठल देवकाते, बापू कवले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
12 Sep 2025 11:36 AM (IST)
सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी (दि. ८) रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे ७५) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरात न आढळल्याने संगिता खाशाबा कोळेकर यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना साडेदहा वाजता ही माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता संगिता आणि त्यांचा मुलगा संतोष रानात गेले असता, त्यांना हिराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसला. या घटनेनंतर राणंद गावात खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून हा खून घडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
12 Sep 2025 11:16 AM (IST)
हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या बोरगाव (तालुका कोरेगाव) येथील तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव (वय ३२, सध्या राहणार श्री अपार्टमेंट, अहिरे कॉलनी, लक्ष्मीनगर, सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. प्रभावती सोरफ (वय 80 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच वृद्ध महिलेल्या मृत्युविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.