संग्रहित फोटो
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाच्या झालेल्या खून प्रकरणात गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह ४ जणांना सोमवारी रात्री बुलढाणा येथून जेरबंद केले. टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (६८, रा. नाना पेठ) हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. आयुषच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली असून, आंदेकरच्या ताबेमारी अथवा अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून महापालिकेला लवकरच पत्र पाठवले जाणार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२, रा. नाना पेठ), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४० , रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, डोके तालीमजवळ), तुषार निलंजय वाडेकर (वय २६, रा. नाना पेठ), अमन युसूफ पठाण ऊर्फ खान (रा. डोके तालीमजवळ), सुजल राहुल मेरगू (वय २३) अमित प्रकाश पाटोळे (वय १९) आणि यश सिद्धेश्वर पाटील (सर्व रा. नाना पेठ) यांना अटक केली आहे. या टोळीने शुक्रवारी (दि. ५) नाना पेठेत आयुष उर्फ गोविंद कोमकर (१८, रा. नाना पेठ ) याचा खून केला होता.
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह टोळीविरोधात यापूर्वी देखील विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुलगा वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या आपल्याच नातवावर गोळीबार करून खून घडवून आणला आहे. या टोळीतील शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नानापेठ) या फरार असलेल्या पाचही जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान, या टोळीविरोधात मकोका कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कारवाईचा प्रस्ताव तयार केला. उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या वतीने अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कुख्यात आंदेकर टोळीने दहशतीच्या जोरावर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकामे, ताबेमारी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून, त्याद्वारे अनधिकृत बांधकामावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. टोळीचा मुख्य आर्थिक कणा मोडून त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासोबतच आंदेकर टोळीतील विविध स्तरातील सक्रीय लोकांना देखील सोडणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
आंदेकरच्या घराची झाडाझडती
दरम्यान, बुधवारी (दि. १०) बंडू आंदेकर याच्या नाना पेठेतील घराची गुन्हे शाखेसह समर्थ पोलिसांनी झाडाझडती घेतली. रात्री उशीरापर्यंत ही झडती सुरू होती. यावेळी मोबाईल अथवा आयुषच्या खुनाच्या नियोजनासंदर्भात काही पुरावे सापडतायेत का याचा शोध पोलिसांकडून
घेतला जात होता. झडतीवेळी घरात आंदेकर परिवारातील सुना घरात होत्या, पोलिसांनी बंडू आंदेकर याला देखील सोबत नेले होते. आयुषच्या खुनासाठी आंदेकर टोळीने नवख्या लोकांचा वापर न करता अनुभवी लोकांद्वारे हे कृत्य केले असल्याची बाब पोलिस तपासात
समोर आली आहे.