संग्रहित फोटो
दहिवडी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही गस्त घातली जात आहे. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नाही. अशातच आता सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी (दि. ८) रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे ७५) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरात न आढळल्याने संगिता खाशाबा कोळेकर यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना साडेदहा वाजता ही माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता संगिता आणि त्यांचा मुलगा संतोष रानात गेले असता, त्यांना हिराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसला. या घटनेनंतर राणंद गावात खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून हा खून घडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिस ठाण्यास कळवले. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूरचे मोहन हांगे, नंदकुमार खाडे व पोलीस कर्मचारी होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. हिराबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि सहा नातवंडे असा परिवार आहे. पोलिस संशयित स्वप्निल मोटे याचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून पत्नीला सातत्याने मारहाण करत असताना पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला आहे. योगेश कैलास जाधव (वय ३३, रा. चंदनवाडी, चांदखेड, मावळ) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. चांगुणा योगेश जाधव यांचा खून झाला होता. याबाबत चांगुणा यांचे वडील शिवाजी दामू ठाकूर (वय ४५, रा. परंदवाडी, मावळ) यांनी तक्रार दिली होती.