संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काळेपडळ येथील क्लाऊड नाईन सोसायटीजवळ घडलेल्या टँकर व दुचाकीच्या अपघातप्रकरणात पोलिसांनी टँकर चालकासह टँकर मालकाला अटक केली आहे. चालक दारूच्या नशेत टँकर चालवित होता. त्यामुळे हा अपघात झाला व यात १९ वर्षीय तरुणाला मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
टँकर मालक नितीन मधुकर ननावरे (वय ४६, रा. कोणार्कपुरम सोसायटी) तसेच चालक रवींद भीमराव दनाने (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या अपघातात आरिज एजाज शेख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंद आहे. टँकर नितीन ननावरे याचा आहे. तर, रवींद्र दनाने त्यावर चालक म्हणून काम करत होता. पण, रवींद्र याला दारूचे व्यसन आहे. ही गोष्ट मालक नितीन याला माहिती होती. तरीही त्याने त्याला नोकरीस ठेवले आणि त्याच्या ताब्यात टँकर देखील चालविण्यास दिला.
दरम्यान, घटनेच्या दिवशी रवींद्र हा दारू पिऊन टँकर चालवित शीतल पेट्रोल पंपाजवळून जात होता. तेव्हा दुचाकीस्वार आरिज हा तेथून जात असताना रवींद्र याने त्याच्या दुचाकीला पाठिमागून धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला. पोलिसांनी प्रथम रवींद्र याला अटक केली. चौकशीनंतर त्याला दारूचे व्यसन असल्याचे तसेच अपघाताच्यावेळी देखील तो दारू पिला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी टँकर मालक नितीन ननावरे यालाही जबाबदार धरत अटक केली आहे.
ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना!
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. स्नेहल रवींद्र अहिनवे (रा. अहिनेवाडी, ता. जुन्नर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११: २० ते ११:३० च्या सुमारास स्नेहल अहिनवे या आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीने मोनिका चौकातून जात होत्या. यावेळी कल्याणकडून ओतूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कुटीच्या मागील सीटवर बसलेल्या स्नेहल या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत स्नेहल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.






