संग्रहित फोटो
वडगाव मावळ : पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. कुणेनामा (ता. मावळ) येथील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि सहा आलिशान गाड्यांसह एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बंगला मालकासह २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलिशान बंगल्यात ‘फ्लॅश’चा जुगार
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, कुणेनामा परिसरातील एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २१ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ४: ४० वाजता पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी दोन टेबलांवर ‘फ्लॅश’ (तीन पानी) हा जुगार खेळताना आरोपी रंगेहाथ सापडले. तपासादरम्यान, आरोपी करण पाटील याने सदर बंगला मालक हनुमंत थोरबोले याच्याकडून ६० हजार भाड्याने घेऊन येथे जुगार अड्डा सुरू केल्याचे उघड झाले.
आलिशान गाड्या आणि महागडे मोबाईल जप्त
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य तसेच मोठ्या प्रमाणावर विलासी वस्तू जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये Hyundai Venue, Kia Seltos, Maruti Swift, Ford Endeavour, Kia Sonet आणि Volkswagen या गाड्यांचा समावेश आहे. तसेच ॲपल, सॅमसंग आणि ओप्पो कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
२२ जणांवर गुन्हा; महिलांचाही सहभाग
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील व्यावसायिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पणजी (गोवा) येथील तीन महिलांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे लोणावळा आणि मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांचा कडक इशारा
“पर्यटनस्थळांच्या नावाखाली शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सहन केले जाणार नाही. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे,” — लोणावळा पोलीस प्रशासन.






