सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यभरात शासन “लाडकी बहिण” योजना राबवत असताना पुरोगामी पुण्यात संपत्तीच्या वादातून भाऊ संपत्तीसाठी कसाई झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कसाई भावाने चक्क ‘बहिणीची’ हत्या करून तिच्या मृतदेहाचे टुकडे केले. ते नदीपात्रात फेकून दिल्याचे पुणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. मुळा नदीपात्रात ४ दिवसांपुर्वी महिलेचे हात-पाय व मुंडके नसलेले धड मिळाले होते. त्याचा उलघडा करून पोलिसांना हा प्रकार समोर आणला. भावाने व वहिणीने धारधार हत्याराने दोन्ही हात-पाय आणि मुंडके कापून ते तुकडे नदीपात्रात टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याघटनेने मात्र शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सकीना अब्दुल खान (वय ४८, रा. नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर) असे खून झालेल्या या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाऊ अश्पाक अब्दुल खान (वय ५१) व त्याची पत्नी हमीदा खान (वय ४५) यांना अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक अनिल माने व त्यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या आठवड्यात खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात दोन्ही हात-पाय तसेच मुंडके नसलेले तरुणाचे धड आढळून आले होते. राज्यात महिला अत्याचारांचेप्रकरण सुरू असताना अशाप्रकारे निर्घृन खूनकरून मृतदेह टाकल्याने शहर पोलिसांनी गांर्भियाने घेत तपास सुरू केला होता. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेची दहा पथके याप्रकरणाचा तपास करत होते.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शहरातील ३२ पोलीस ठाण्यात दाखल मिसींग तसेच अपहरण झालेल्या महिला व तरुणींची माहिती गोळा केली. तर, मिळालेल्या मृतदेहावरील व्रण पाहून माहिती देण्याचे आवाहन केले होते. घटनास्थळ ते नदीपात्राच्या उलट्यादिशेने शोध घेत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तर, माहिती देणाऱ्याला २ लाखांचे बक्षिस देखील जाहिर केले होते.
त्याचवेळी मृत महिलेच्या भाच्चीने शिवाजीनगर पोलिसांत मावशी बेपत्ता आहे. तिच्यात आणि मामामध्ये संपत्तीवरून वाद होते, असे सांगत संशय व्यक्त केला. पोलिसांनी मृत महिला व संबंधित महिलेचे फोटो पाहिले असता त्यांच्यात साम्य आढळून आले. लागलीच पथकाने आरोपी अश्पाक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पत्नीसोबत गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागात दाखल झालेल्या ३० ते ६० वयोगटातील तब्बल २०० मिसींगचा तपास केला.