नियमबाह्य फी म्हणून मागितली लाच
सिंदीचे पीएसआय एसीबीच्या जाळ्यात
केली होती पैश्यांची मागणी
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असताना आता वर्धा जिल्ह्यात दारू विक्रेत्याकडून 2 हजार 500 रुपयांची मागणी करणाऱ्या सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोहर रामदास चांदेकर (वय 57) यांना सापळा रचून एसीबीने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.1) करण्यात आली.
16 नोव्हेंबर रोजी अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराच्या ताब्यातील (एमएच-49/एम-7242) गाडीचा वापर करण्यात आला होता. यासाठी त्याच्यावर सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 27 जानेवारी रोजी 2 हजार 500 रुपयांची मागणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चांदेकर यांनी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी विभागाला माहिती दिली. याच माहितीवरून एसीबी विभागाने शनिवारी (दि. 1) पंचासमक्ष 2 हजार 500 रुपये स्वीकारल्याने आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेण्यात आले असून, सिंधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सिंदी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैशाली वैरागडे, पोलिस निरिक्षक अरविंद राऊत, संदीप मुपडे, मंगेश गंधे, प्रशांत वैद्य, पंकज डहाके, पंकज टाकोणे, गणेश पवार, चालक मेश्राम, राखी फुलमाळी, अंमलदार विनोद धोंगडे, मनीष मसराम, लक्ष्मण केंद्रे, प्रीतम इंगळे, बादल देशमुख आदींनी केली.