वरई उड्डाणपुलावर ट्रकचा टायर निखळून पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी
मनोर / नाझीम खतीब : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर तालुक्यातील वरई येथील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.14) भरधाव ट्रकचा टायर अचानक निखळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात महामार्ग वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक यादव बोराडे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरई उड्डाणपुलावरून गुजरातच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक जात असताना अचानक त्याचा टायर निखळला. वेगात असलेला हा टायर नियंत्रणाबाहेर जाऊन समोरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या धडकेनंतर निखळलेला टायर मोठ्या वेगाने महामार्गाच्या कडेला फेकला गेला. त्याचवेळी महामार्ग वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक यादव बोराडे हे महामार्गालगत उभे होते. अचानक वेगाने आलेला टायर त्यांच्या अंगावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पोलिस उपनिरीक्षक यादव बोराडे यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
वाहन तपासणीकडे चालकांचे दुर्लक्ष
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या महामार्गावर अवजड वाहनांच्या तांत्रिक बिघाडामुळे यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. वाहनांचे टायर, ब्रेक तसेच इतर महत्त्वाच्या यंत्रणांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असतानाही काही वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विशेष म्हणजे महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातग्रस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच निखळलेल्या टायरचा फटका बसल्याने महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अवजड वाहनांची नियमित तपासणी आणि त्यांच्या टायरची सुरक्षितता तपासण्याची मागणी होत आहे.
गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत ६ मजुरांचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, हाताला काम मिळेल, कुटुंबाला दोन घास सुखाचे मिळतील…या आशेने मध्य प्रदेशातील मजूर तेलंगणाच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांचा हा प्रवास गोंदिया जिल्ह्यातील नागराजवळ काळाने झडप घातल्याने कायमचा थांबला. भरधाव ट्रकच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.






