संग्रहित फोटो
पुणे : देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हातात असलेले लोखंडी हत्यार भररस्त्यात हवेत फिरवत धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप उकिर्डे यांनी यांच्या तक्रारीवरून लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहंमद उर्फ फैज तबरेज काझी (२०, रा. भवानीपेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहंमद याने शनिवारी (दि. १८) संध्याकाळी पाचच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जवळ रस्त्यावर उभा असताना हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवत, ‘मैं यहाँ का भाई हूँ, अगर कोई मेरे बीच में आया तो मैं उसको खल्लास करूँगा’ असे मोठमोठ्याने बोलत परिसरात दहशत माजवली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलिस कर्मचारी मेंगे करत आहेत.
तासगावात मित्रानेच केली मित्राची हत्या
तासगाव तालुक्यातील पाचवा मैल (निमणी) येथे शनिवारी सकाळी जुन्या वादाच्या रागातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी नागांव येथील दोघांविरोधात तासगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मृताचे नाव चेतन उर्फ बुलट्या दुर्व्या पवार (४५, रा. पाचवा मैल, ता. तासगाव) असे आहे. याबाबत त्यांचा भाचा गणेश सुनिल काळे यांनी रोहित उर्फ बाळया पोपट मलमे (वय २६) आणि दत्तात्रय मच्छिंद्र गुजले (वय ३६) (दोघे रा. नागांव, ता. तासगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.