संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील गँगस्टर तसेच गुंडांचे ‘पुण्याचे मालक’ आणि ‘बॉस’ असे रिल्स व्हायरल करणाऱ्या सोशल मिडीया फॅन्संना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. चार तरुणांना वेगवेगळ्या शहरांमधून पकडले असून, तब्बल १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या अकाऊंटवरून हे रिल्स टाकण्यात येत होते. रिल्समुळे गुन्हेगारीचे उद्दातीकरण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अक्षय निवृत्ती शिंदे (वय २०, रा. जि. अहिल्यानगर), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय १९), साहिल शादुल शेख (वय१९), इरफान हसन शेख (वय १९, रा. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात एकूण १३ अकाऊंट धारकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यातील आतापर्यंत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण केल्यास कडक कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. काही दिवस हे प्रकार थांबले, परंतु नंतर पुन्हा गुन्हेगारीचे उद्दातीकरण करणारे रिल्स सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत होते. दरम्यान पुण्यातील कुख्यात गुंडाच्या नावाने तसेच त्यांचे फोटो व व्हिडीओ वापरून दहशतीचे रिल्स बनविले जात होते. काही ठरावीक गुंडाचे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत होते. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाला याबाबत तपासाच्या सूचना केल्या होत्या. वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार व त्यांच्या पथकाने पाहणी केल्यानंतर गुंड गजानन मारणे याचे रिल्स असल्याचे दिसून आले. एकूण १३ अकाऊंटवरून त्याचे व्हिडीओ होते. त्यात ”किंग ऑफ पुणे सिटी, पुण्यातील गुन्हेगारांची मुंबईच्या टोळ्यांशी हातमिळवणी, किंग ऑफ महाराष्ट्र, पुण्याचा बाप कोण, जस मुंबईत एकच दादर तस पुण्याचा एक फादर” अश्या टॅग लाईनवर व्हिडीओ व्हायरल केले जात होते.
गुन्हेगारांच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार करून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यातील एक आरोपी धाराशिवचा असून, त्याने गुंड गजा मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर पेज तयार केले होते. त्यावरून गुन्हेगारीला खतपाणी घालणारे फोटो, व्हिडिओ व्हायरल करत होता. याशिवाय आणखीही वेगवेगळ्या सोशल मीडियावरून गुंडांचे उदात्तीकरण केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. नंतर पोलिसांनी अशा प्रकारचे पेजेस चालवणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यातील एका आरोपीला धाराशिव येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुंड गजा मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार केले होते. त्याच्या अकाउंटला एक लाखापेक्षा अधिक फॉलोवर्स होते. यावरून गुन्हेगारीला खतपाणी देणारे रिल्स व्हायरल करत होता. शिवाय इतर गुन्हेगारांच्या नावाने सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणाऱ्या इतर तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.






