धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (संग्रहित फोटो)
लातूर : देवणी तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणातील नराधमाला उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
अल्ताफ महेबुब खुरेशी (वय २०) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. २० जानेवारी २०२४ रोजी पीडित बालिका शाळेतून परतल्यानंतर घराजवळ एकटी खेळत असताना तिला दुकानातून चॉकलेट व बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून त्याच्या चुलत्याच्या घरी घेऊन गेला व जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या पीडितेने तिच्या आईला हकीकत सांगितल्यानंतर, गेल्या पाच दिवसांपासून आरोपी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालाटकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील अॅड. एस. आय. बिरादार यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने बुधवारी आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी धरत नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पीडितेला मिळणार भरपाई
न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या ५० हजार रुपयांच्या दंडाची रक्कम पीडित बालिकेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. सदरचा दंड नाही भरल्यास ६ महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा असणारा आहे. आरोपी ३० जानेवारी २०२४ पासून कोठडीत असून, शिक्षेच्या काळात त्याला यापूर्वीच्या कारावासाची वजावट मिळणार आहे. सहा वर्षांच्या निरागस बालिकेवर शेजाऱ्यानेच केलेला हा अत्याचार समाजाला सुन्न करणारा असल्याने, न्यायालयाने या प्रकरणात कोणतीही दया न दाखवता आरोपीला मरेपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा कठोर आदेश दिला आहे.
दुकान पेटवून देण्याची धमकी देत अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, आमदाबाद (ता. शिरूर) येथील एका अल्पवयीन युवतीस जीवे मारण्याची आणि दुकान पेटवून देण्याची धमकी देत एका नराधमाने त्याच्या मित्राच्या मदतीने पाच महिने अत्याचार केला असल्याची घटना घडली. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल त्यांना अटक करण्यात आली.






