गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी 'या' भागात सापळा रचून पकडले
पुणे : गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५, रा. वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक, अमोल पिलाणे व महेश गाढवे यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात ड्रग्ज तस्कर व गांजाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, वानवडी पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी तपास पथकाला अविनाश व संजय या दोन गुन्हेगारांबाबत माहिती मिळाली. ते गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजताच पथकाने त्यांची माहिती काढली. तेव्हा आरोपी रामटेकडी येथील औद्योगिक वसाहत परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने दोन वेगवेगळ्या टीम करून या भागात सापळा रचला. परंतु, दोन्ही आरोपींना पोलिस आल्याची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांना काही अंतरावरच पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १ किलो ७३४ ग्रॅम गांजा मिळून आला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. दोघांनी गांजा कोणाकडून आणला तसेच ते कोणाला विक्री करणार होते, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई
नागपूरच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या युवकाला गजाआड केले. वेंकटेश सोनपदरे (वय 25, रेशीमबाग रहिवासी) असा आरोपीचा नाव असून त्याच्याकडून तब्बल 238 ग्रॅम गांजा, तीन मोबाईल आणि मोटारसायकल मिळून एकूण ₹2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पेट्रोलिंगदरम्यान पीएसआय वारंगे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई झाली. चौकशीत आरोपी शेख सलीमच्या सांगण्यावरून गांजाची विक्री करीत असल्याचे उघड झाले. पोलिस आता या प्रकरणातून गांजाच्या पुरवठा साखळीचा तपास करत आहेत.