सौजन्य - नवराष्ट्र टीम
जालना : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा समाजाच्या लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सदावर्ते हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच आज मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर आंदोलकांना भेटण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील, असे पोलिसांना वाटले नव्हते. मात्र, एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते यांची गाडी गाठण्यात यश मिळवले. या आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर धावून जात काचेवर फटके मारले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी मराठा आंदोलकांना तातडीने पकडले. मात्र, तोपर्यंत दोन-तीन मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीच्या काचेवर फटके मारले होते. यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
यापूर्वी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना काही मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांना अनेकदा इशारेही देण्यात आले होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणे सुरुच ठेवले आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील लोहगाव भागात रिक्षाचालकावर हल्ला; बांबूने मारहाण करुन लुटले