आता RBI बँकेला बॉम्बनं उडवण्याची धमकी, रशियन भाषेत आला ई-मेल (फोटो सौजन्य-X)
RBI Bomb Threat Marathi News: विमानं आणि शाळांनंतर आता देशातील मध्यवर्ती बँक असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) धमकीचा मेल आला आहे.गुरूवारी रात्री एक धमकीचा ई-मेल आला असून त्यात ई-मेल रशियातून आल्याचे भासवण्यात आले आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धमकीचा ईमेल रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर आला आहे.
देशातील धमकीचे कॉल्स आणि ई-मेल्सचा ओघ थांबायचं नाव घेत नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. RBI गव्हर्नरच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला आहे. मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Mumbai | A threatening email was received on the official website of Reserve Bank of India. The email was in Russian language, warned to blow up the bank. A case has been registered against unknown accused in Mata Ramabai Marg (MRA Marg) police station. Investigation into the…
— ANI (@ANI) December 13, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर आला आहे. धमकीचे ईमेल रशियन भाषेत असल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहेत.
या धमकीच्या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय असेल, याचा शोध घेतला जात आहे. ईमेलचा आयपी ॲड्रेसही तपासला जात असून त्यासाठी गुन्हे शाखा आणि सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
याआधीही गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कस्टमर केअर विभागाला धमकीचा फोन आला होता. सकाळी दहाच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर हा कॉल आला होता.फोनवरील असलेल्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे असे सांगून फोन बंद केला होता. दिल्लीतील 16 शाळांनाही अशीच धमकी मिळाली होती. ही धमकी ई-मेलद्वारे मिळाली असून त्यात शाळा स्फोटकांनी उडवल्या जातील, असे म्हटले आहे. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ईमेलद्वारे मिळालेल्या या धमकीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि शाळांमध्ये शोधमोहीम राबवली मात्र काहीही सापडले नाही. तपासानंतर पोलिसांनी धमकीचा ईमेल खोटा असल्याचे घोषित केले.