सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता स्वारगेट भागातील सणस ग्राऊंडजवळ मुख्य रस्त्यावरून निघालेल्या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीस्वार चोरट्यांचे धाडस वाढल्याचे अन् त्यांचा उच्छांद थांबत नसल्याचे देखील दिसत आहे. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या गुरूवार पेठेत राहण्यास आहेत. त्या काही कामानिमित्त स्वारगेट भागात आलेल्या होत्या. त्या सणस ग्राऊंड रोडवरून पायी चालत जात होत्या. सणस पुतळ्याजवळ आल्यानंतर पाठिमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली. पुढील तपास उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तरुणावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला घेतले ताब्यात
ज्येष्ठ महिलेला धक्का देऊन घरातून सोने पळविले
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत माने वस्ती परिसरात चोरट्याने ज्येष्ठ महिलेला धक्का देऊन घरात प्रवेश करत घरातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून, याप्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गोडसे करत आहेत.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.