संग्रहित फोटो
फोटो तयार करण्यासाठी APK डाउनलोड करण्यास सांगितले जाते
सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांना फोटो तयार करण्यासाठी एखादे एडिटिंग किंवा AI ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अनेकदा यासाठी APK फाइल डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते. मात्र, अनोळखी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करून ॲप इन्स्टॉल केल्यास मोबाईलच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
Permissions देताना सावध राहा
बनावट ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते SMS, नोटिफिकेशन्स, कॉन्टॅक्ट्स, डिव्हाइसची माहिती आणि इतर संवेदनशील डेटासाठी परवानग्या मागू शकते. वापरकर्त्याने या परवानग्या दिल्यास OTP किंवा बँकिंगशी संबंधित माहिती अनधिकृतपणे ॲक्सेस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ आकर्षक फोटो तयार करण्यासाठी अनोळखी ॲपला गरजेपेक्षा जास्त Permissions देणे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
या फसवणुकीचा धोका केवळ मोबाईल किंवा बँकिंग माहितीपुरता मर्यादित नाही. वापरकर्त्यांकडून मिळवलेल्या उच्च-गुणवत्तेच्या चेहऱ्यांच्या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यताही आहे. अशा फोटोंच्या आधारे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल किंवा डीपफेक तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी ॲप किंवा वेबसाइटवर वैयक्तिक फोटो अपलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासणे महत्त्वाचे आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
WhatsApp किंवा SMS वरून आलेल्या अनोळखी फोटो-एडिटिंग किंवा AI ॲपच्या लिंकवर क्लिक करू नये. अनोळखी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करू नये. कोणतेही AI किंवा फोटो-एडिटिंग ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याचा Developer, Reviews आणि मागितल्या जाणाऱ्या Permissions तपासाव्यात. एखादे ॲप आपल्या कामासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त परवानग्या मागत असल्यास ते इन्स्टॉल करणे टाळावे. आधीच संशयास्पद ॲप इन्स्टॉल केले असल्यास ते तातडीने अनइन्स्टॉल करावे. तसेच, अशा ॲपच्या वापरानंतर बँक खात्यातील व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या खात्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास वेळ न दवडता १९३० या सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. रेट्रो फोटोचा ट्रेंड कितीही आकर्षक वाटत असला, तरी अनोळखी लिंक, APK फाइल आणि संशयास्पद ॲपपासून सावध राहणे आवश्यक आहे. ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे.






