सौजन्य - नवराष्ट्र टीम
बॅंक खाती ऑपरेट करणारे सापडल्याने भांडाफोड
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१७(२), ६१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सायबर फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. मोरे वस्ती, चिखली रोड) याच्याबाबत माहिती मिळाली. तो साथीदारांच्या मदतीने बँक खाती उघडून त्यामध्ये सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तुषार चौधरी आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करून तपास केला. त्यावेळी या दोघांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून त्यांची माहिती दुबईत राहणाऱ्या सुमंत ऊर्फ नानू दसरे याला दिल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर तुषार आणि आदर्श हे चेकद्वारे पैसे काढत असत. त्यातील कमिशन स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम सीडीएमद्वारे सुमंतने दिलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात होती.
चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी
सुमंत हा सुरुवातीला दुबईमध्ये सहा हजार पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत होता. त्याने चिनी आरोपींकडून वेगवेगळी आंतरराष्ट्रीय कार्ड मिळवून ती मॉल आणि अन्य ठिकाणी स्वाइप करून महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. या कामादरम्यान त्याला सायबर फसवणुकीच्या संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती झाली. त्यानंतर त्याने चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी करून फसवणुकीचे गुन्हे सुरू केले.
एलओसी आणि इंटरपोलच्या मदतीने दुबईतून ताब्यात
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी आरोपीची माहिती मिळवली. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर (एलओसी) जारी केले. या एलओसीच्या आधारे इंटरपोलच्या मदतीने सुमंत याला दुबईत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला भारतात डिपोर्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात अटक केली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Ans: सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे आरोपीचे नाव आहे. त्याला इंटरपोलच्या मदतीने दुबईतून ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले.
Ans: तपासात सुमंत याने १५७ हून अधिक बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे.
Ans: सुमंत याने दुबईत चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी करून ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालवले. शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडच्या माध्यमातून त्याला सायबर फसवणुकीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली होती.






