CBI ने केली पोलखोल, RG Kar College चे माजी प्राचार्याचा मोठ्या रॅकेटमध्ये सहभाग, आंदोलकांनी केली फाशीची मागणी
कोलकाता येथील आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना सीबीआयने सोमवारी (2 सप्टेंबर) आर्थिक अनियमिततांच्या आरोपाखाली अटक केली. या घटनेनंतर माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासोबत सीबीआयचे पथक अलीपूर कोर्टात पोहोचले होते. ही घटना मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी घडली. सीबीआयने घोष यांना अलीपूर न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. घोष यांना पाहताच आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत त्यांना फाशीची मागणी केली.
मात्र, नंतर पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. न्यायालयाने घोष आणि इतर तिघांना 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. घोष यांच्यावर आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. माजी प्राचार्याला केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि कोलकाता पोलिसांच्या संरक्षणाखाली आणण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप घोष ३ सप्टेंबरला न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच कोर्टाबाहेर गर्दी जमली होती. सीबीआयचे पथक त्यांच्यासोबत न्यायालयाच्या आवारात पोहोचताच लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. वकिलांचाही यात समावेश होता. कोर्ट रूमच्या आतही अनेकांनी संदीपला शिवीगाळ केली. संतप्त जमाव लक्षात घेऊन घोष यांना न्यायालयातून बाहेर काढण्यापूर्वी परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सीआरपीएफने सुरक्षा दलांची संख्या वाढवली.
कोलकाता पोलिसांनीही अधिक पोलीस तैनात केले आहेत. सीआरपीएफने मानवी साखळी करून घेराव घातला होता. असे असतानाही संदीप घोष बाहेर येताच लोकांनी गोंधळ घातला. सीबीआयचे पथक त्याला कारमध्ये बसवत असताना गर्दीतून कोणीतरी त्यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, त्याचा हात संदीप यांच्या डोक्याला लागला. दरम्यान, घोष यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जी यांच्या सरकारने त्यांना पश्चिम बंगाल आरोग्य विभागाच्या वैद्यकीय परिषदेच्या पदावरूनही निलंबित केले.
2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी संदीप घोषसह आणखी तिघांना अटक करण्यात आली. बिप्लव सिंग, सुमन हाजरा आणि अफसर अली खान अशी अन्य तीन जणांची नावे आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आर.जी.कार मेडिकल कॉलेजचे माजी उपअधीक्षक डॉ.अख्तर अली यांनी संदीप घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमिततेचा गुन्हा दाखल केला होता. घोष यांच्यावर रुग्णालयात बेवारस मृतदेहांची तस्करी, जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात भ्रष्टाचार आणि बांधकाम निविदांमध्ये घराणेशाहीचे आरोप होते. कोलकाता पोलिस यापूर्वी या प्रकरणांचा तपास करत होते. पण नंतर कोलकाता उच्च न्यायालयाने ते सीबीआयकडे सोपवले. 3 सप्टेंबर रोजी अलीपूर कोर्टाने या चार आरोपींना 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती.
९ ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमधून एका कनिष्ठ डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांनी राजीनामा दिला. पण काही काळानंतर त्यांना कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्ती मिळाली. त्यांच्या नियुक्तीला विरोध झाला. आणि या प्रकरणातही घोष यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना रजेवर पाठवण्यात आले.
कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष हे एका मोठ्या रॅकेटचा भाग होते, याचा पदार्फाश करणे आवश्यक होते असं सीबीआयने विशेष न्यायालयाने सांगितलं. रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. याप्रकरणी संजय घोषला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली असून याप्रकरणी १२ सीबीआय अधिकारी आणि २५ सीआरपीएफ जवान त्याच्या संरक्षणासाठी उपस्थित होते.