
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू भोसकला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि वर आम्ही या एरियातील डॉन आहोत अशी धमकी दिली. मुकुंदवाडी परिसरात १० ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या या प्रकाराने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी वेगाने तपास करत वैभव शिंदे, विजय जगताप आणि कार्तिक बामणे या तिघांना काही तासांत अटक केली. तिघा आरोपींना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी दिली.
प्रकरणात मिथुन अशोक जैस्वाल (४२, रा. पारिजात नगर, सिडको एन-४) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, जैस्वाल यांचे मुकुंदवाडी रेल्वेस्थानक ते जय भवानी नगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रभू सेवा आयुर्वेदा नावाचे मेडिकल दुकान आहे. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ते दुकानात असताना जय भवानी नगरातील वैभव शिंदे, विजय जगताप आणि कार्तिक बामणे तेथे आले. वैभव याने दुकानातील ग्राहकांसाठी ठेवलेली खुर्ची उचलून जैस्वाल यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हाताने खुर्ची अडवून त्यांना जाब विचारला.
यावेळी विजय जगताप याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर वैभव शिंदे याने कमरेतून चाकू काढून जैस्वाल यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला भोसकला. जैस्वाल ओरडत असताना विजय जगताप आणि कार्तिक बामणे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर वैभव आणि विजय यांनी दुकानाच्या गल्ल्यातील १,२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही रक्कम जैस्वाल यांच्या भावाने सकाळी किराणा सामान आणण्यासाठी दिली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. उपनिरीक्षक विनोद भालेराव, हवालदार चव्हाण आणि वाघ यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून तिन्ही आरोपींना मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरातून काही तासांत अटक केली. विजय जगताप याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे दोन ते तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती उपनिरीक्षक भालेराव यांनी दिली.
Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप