सौजन्य फोटो - AI Gemini
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर गावच्या हद्दीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मोठ्या भावासोबत वीटभट्टीजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. खुशबू बसंत बसदेवा (वय १०, रा. आर्वी, ता. हवेली) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे बसदेवा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसदेवा कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदवार जिल्ह्यातील आहे. रोजगाराच्या शोधात ते महाराष्ट्रात आले असून, वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ज्या ठिकाणी हे कुटुंब काम करते, त्याच वीटभट्टीजवळ शेततळे आहे. या शेततळ्यात पाणी असल्याने परिसरातील मुले पोहण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी दुपारी खुशबू आपल्या मोठ्या भावासोबत शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. दोघेही पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच खुशबू पाण्यात बुडाली. ती दिसेनाशी झाल्याने भावाने आणि परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती तातडीने तिच्या वडिलांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शेततळ्यात खुशबूचा शोध सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर खुशबूला मृत घोषित केले. अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसंत गयाप्रसाद बसदेवा यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर शेततळे आणि जलसाठ्यांच्या ठिकाणी लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीशिवाय जाऊ नये, अशी गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.






