खळबळजनक ! 3 वर्षांच्या मुलाची सावत्र बापाने केली हत्या; पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा केला बनाव (संग्रहित फोटो)
उरण : किरकोळ कारणावरून तीन वर्षांच्या सावत्र मुलाचा शारीरिक व मानसिक छळ करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उरण तालुक्यात उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी बालकाचा पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या सावत्र बापाविरुद्ध मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
उरण प्रकरणातील या नराधमाने 14 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घरात एकटा असलेल्या ३ वर्षे ५ महिने वयाच्या या बालकावर गंभीर हल्ला केला. हा मुलगा त्यांच्या पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा असल्याने, हा नराधम त्याच्यावर राग धरून होता व त्याला सतत मारहाण करत असे. घटनेच्या दिवशी त्याने चिमुरड्याला हाताच्या ठोशांनी व जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून गंभीर दुखापत केली, ज्यामध्ये बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगा खेळताना पलंगावरून य खाली पडून बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आणि फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी नराधमाच्या विरोधात विविध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. मयंक लोहार (Mayank Lohar) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या थरारक हत्याप्रकरणानंतर लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत मुख्य आरोपी रोशन सुवर्णा (Roshan Suvarna) याला अवघ्या २४ तासांच्या आत कुर्ल्यातून अटक केली आहे.






