उरण : मागील महिन्यात श्रीवर्धन (Shrivardhan) येथे आढळलेल्या संशयित बोटीत (Suspected Boat) शस्त्रास्त्रे आढळून आली होती. तर, दोन दिवसांपूर्वी अमली पदार्थांचा साठा आढळून आला होता. त्यामुळे रायगड पोलीस (Raigad Police) सतर्क झाले आहे. त्यातच उरण तालुक्यात संशयित बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे.
करंजा बंदरातून (Karanja Port) आज संशयित बोट ताब्यात घेण्यात आली आहे. उरण पोलीस (Uran Police) याबाबत अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील (Arabic Sea) दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी (Fisheries Department Officers) गस्त घालत असताना त्यांना विना क्रमांकाची बोट आढळून आली. या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे.
उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे. या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली.
बोटीत डिझेल आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी बंदरात गस्ती घालीत असताना विना क्रमांकाची बोट आढळून आली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली.