संग्रहित फोटो
ठाणे: ठाण्यातील सुभाषनगर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या चितळसर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर (५६) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किसन भोईर हे आपल्या सहकाऱ्यांसह पीसीआर-१ वाहनातून चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालत होते. पोखरण रोड क्रमांक दोन परिसरातील गांधीनगर आणि सुभाषनगर भागातून पोलिस पथक जात असताना ही घटना घडली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रेकॉर्डवरील आरोपी राजू वाल्मीकी (३०) याने भोईर यांच्यावर पाठीमागून बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी भोईर हे पोलिस गणवेशात कर्तव्य बजावत होते. हल्ल्यानंतर भोईर यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
या प्रकरणातील आरोपी राजू वाल्मीकी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीने हल्ला का केला, त्यावेळी नेमके काय घडले आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.






