सौजन्य फोटो - सोशल मिडीया
नागपूर : शहरातील दिघोरी, हुडकेश्वर आणि सक्करदरा परिसरात एकट्या-दुकट्या महिलांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने आणि पर्स लुटणाऱ्या हर्ष ऊर्फ एक्का महेंद्र रामटेके (वय २५, रा. तिरोडा, जि. गोंदिया) याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर चोरी, वाहनचोरी आणि अपहरणासह सहा गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी सुमारे ७ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिघोरी, हुडकेश्वर आणि सक्करदरा परिसरात एकट्या महिलांना हेरून रामटेके दागिने व पैसे लुटत असल्याचे तपासात समोर आले. या घटनांनंतर पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
सक्करदरा परिसरातील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्यानंतर आरोपीने ते थेट बाजारात विकण्याऐवजी गोल्ड लोनसाठी वापरले. उमरेड येथील मित्राच्या आधारकार्डचा वापर करून त्याने खासगी गोल्ड लोन बँकेत दागिने गहाण ठेवले. त्यातून मिळालेले चार लाख रुपये खात्यात जमा करून घेतल्यानंतर ऑनलाइन यूपीआयच्या माध्यमातून ते स्वतःच्या खात्यात वळते केल्याचे तपासात समोर आले.
६ सप्टेंबर रोजी रामटेकेने नागपुरातून दुचाकी चोरी केली आणि तुमसर गाठले. तेथे पेट्रोल संपल्याने त्याने ती दुचाकी सोडून दिली. त्यानंतर दुसरी दुचाकी चोरी करून तो पुन्हा नागपूरला आला. वाहनचोरीच्या या घटनांचाही तपासात उलगडा झाला आहे.
१२ सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासांच्या अंतरात आरोपीने हुडकेश्वर आणि सक्करदरा परिसरातील तीन महिलांना लक्ष्य केले. त्यांच्या पर्स आणि दागिने हिसकावून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेला मोबाईल विकण्यासाठी त्याने नंदनवन परिसरातील एका परिचित महिलेची मदत घेतल्याचेही समोर आले आहे.
रामटेकेच्या अटकेनंतर चोरी, वाहनचोरी आणि अपहरणासह सहा गुन्ह्यांचा छडा लागला आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.






