
आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या, मोशीतील घटनेनं खळबळ; कार्यकर्ते संतापले
पिंपरी : आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे.
अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६, रा. कुरुळी, खेड) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांच्या वाहनावरील चालक नागनाथ कुंडलिक चाटे (वय ४३, रा. कुरळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गोळे हे पुणे ग्रामीण परिसरात रिअल इस्टेट व्यवसाय करत होते. तसेच ते आरपीआय पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते. महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या कार्य अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. दरम्यान, बुधवारी चालक नागनाथ चाटे हे वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे अनिल गोळे हे स्वतः त्यांच्या फॉरच्यूनर कारमधून फिरत होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास वैभव रोकडे यांनी चाटे यांना फोन करून युवराज गार्डन हॉटेल येथे काहीतरी गंभीर प्रकार झाल्याचे सांगितले. त्यानंतर चाटे घटनास्थळी पोहोचले असता, अनिल गोळे हे हॉटेलमधील कॅश काऊंटरसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना गोळे यांनी चालकाला सांगितले की, काही दिवसांपूर्वी नितीन धोत्रे याच्यासोबत जुन्या कारणावरून त्यांचा वाद झाला होता. त्यावेळी धोत्रे याने “तु माझ्या नादी लागू नको, तुला फार जड जाईल,” अशी धमकी दिली होती. तसेच “नितीन धोत्रे यांच्या सांगण्यावरून दोन अज्ञात मारेकऱ्यांनी माझ्यावर चाकूने हल्ला केला,” असेही त्यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या हत्येमागे जुगार अड्ड्यावरील कारवाईचा राग कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नितीन धोत्रे याचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मोठा जुगार क्लब सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्या क्लबवर धाड टाकून कारवाई केली होती. ही कारवाई अनिल गोळे यांच्या सांगण्यावरूनच झाली असल्याचा संशय धोत्रे याला होता. त्यातूनच दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता, अशी चर्चा सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अनिल गोळे यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. तसेच नाकावर आणि डाव्या गुडघ्यावरही वार करण्यात आले आहेत. उपचारादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करत आहेत.
अनिल गोळे उर्फ मोरे यांचा खून नक्की कोणत्या कारणावरून झाला, ही अद्याप स्पष्ट नाही. त्यांच्या चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार एक संशयिताचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. – गणेश जामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे.