बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना दुबई ट्रीप अन् अलिशान गाडीबड्या बक्षिसांची आश्वासनं देण्यात आली होती. (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजकारण, कन्स्ट्रक्शन लाईन आणि बॉलीवूड अशा क्षेत्रामध्ये नामांकित असलेल्या बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गॅंगने घेतली आहे. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना मोठी बक्षिसं देण्यात येणार होती. आरोपींना परदेशी वारी आणि अलिशान गाडी देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अनेक संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 18 आरोपींपैकी 4 आरोपींना हत्या करण्यासाठी बक्षिस देण्यात येणार होते. याबाबत पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे. या कटात सामील असलेल्या रामफूलचंद कनोजिया (४३) यांनी रुपेश मोहोळ (२२), शिवम कुहाड (२०), करण साळवे (१९) आणि गौरव अपुणे (२३) यांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हे बक्षीस देण्याचे वचन दिले होते. . याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे.
हे देखील वाचा : अजित पवार अन् प्रकाश आंबेडकर यांची भेट! राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण
राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या लोकांना बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार होता. आरोपींना 25 लाख रुपये रोख, अलिशान कार, फ्लॅट आणि दुबई ट्रीपचे आश्वासन देण्यात आले होते. कनोजिया एका वॉन्टेड आरोपीकडून पैसे आणणार होता, असे आरोपीने सांगितले की, कनोजिया हा झीशान अख्तर (23) नावाच्या अन्य एका वॉन्टेड आरोपीकडून पैसे आणणार होता. झिशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे. त्याच्यावर 10 बँक खाती असून हत्येसाठी आरोपींना 4 लाखांहून अधिक रक्कम पाठवल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी पुण्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली, तर खुनाच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने बुधवारी पुण्यातून दोघांना अटक केली. आदित्य गुळणकर (22) आणि रफिक शेख (22) हे कर्वे नगर, पुणे येथील रहिवासी आहेत. त्याला एस्प्लेनेड कोर्टात हजर केले असता 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही बिष्णोई गँगशी संबंधित असून, पुण्यात या खुनाचा कट रचल्याचा संशय आहे. त्यामुळे बिश्नोई गॅंगची पायमुळं ही पुण्यामध्ये पोहचली असल्याचे समोर आले आहे. आरोपी रुपेश मोहोळ याच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली. गुलनाकरला खडकवासल्याजवळ शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलिसांनी सांगितले की सुरुवातीला आणखी नेमबाजांचा समावेश करण्याची योजना होती, परंतु सूत्रधाराने नेमबाजांची संख्या केवळ तीनपर्यंत मर्यादित केली. त्यामुळे आरोपींनी आणखी हत्यारे जमा केली होती.