सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड़ सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ओळखीतून सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती पुरवणाऱ्या दोन अट्टल आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश असून, आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तेजस ज्ञानोबा लोखंडे ( वय २४, मरकळगाव, पुणे), अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ( वय २८, लातूर) अशी अटक केलेल्या अरोपींची नावे आहेत.
सायबर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी १४ जुलै २०२६ रोजी फसवणुकीतील ५ लाख रुपये इंडसइंड बँकेच्या एका खात्यावर वर्ग केल्याचे निदर्शनास आले. हे खाते तेजस ज्ञानोबा लोखंडे याच्या नावावर असल्याचे समोर आल्यावर सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन तेजसला ताब्यात घेतले.
येरवडा जेलमध्ये शिजला गुन्ह्याचा कट
तेजस लोखंडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची संपूर्ण साखळी उघड केली. तेजस हा हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असताना त्याची येरवडा जेलमध्ये अविनाश बाकलीकर याच्याशी ओळख झाली होती. अविनाश बाकलीकर हा यापूर्वी सायबर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात २०२४ मध्ये अटक झाला होता व सुमारे दीड वर्षे येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. जामिनावर सुटल्यानंतर सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळवून देण्याचे नियोजन या दोघांनी इतर साथीदारांसह जेलमध्येच केले होते. जेलमधून बाहेर आल्यावर अविनाशच्या सांगण्यावरून तेजसने स्वतःचे बँक खाते काढून त्याला दिले होते.
भावी डॉक्टर अन् परदेशी साथीदारांचे कनेक्शन
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य सूत्रधार अविनाश बाकलीकर याला लातूर येथून ताब्यात घेतले. अविनाश बाकलीकर हा बी.ए.एम.एस. (डॉक्टर) पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून, तो त्याच्या परदेशी साथीदारांच्या थेट संपर्कात राहून सायबर गुन्हे करत होता. अविनाशने येरवडा जेलमध्ये असताना शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींशी संपर्क वाढवला होता. जेलमधून जामिनावर सुटल्यावर त्याने या गुन्हेगारांचे मोबाईल नंबर स्वतःच्या फोनमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ या नावाने सेव्ह करून ठेवले होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून सायबर गुन्हे करत होता. या टोळीने आतापर्यंत सायबर गुन्ह्यांसाठी ८ वेगवेगळी बँक खाती खोलून आणि प्राप्त करून वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखी वेगवेगळे करंट बँक खाती उघडण्यासाठी त्यांनी सस्टेन ब्लॉक कन्स्ट्रक्शन आणि स्ट्रुनोवा प्रा. लीया नावांनी कार्यालये सुरू केली होती. त्याद्वारे मोठे गुन्हे करण्याची त्यांची तयारी सुरू होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक निरीक्षक वैभव पाटील, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, रोहित डोळस तसेच पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खरात, दीपक भोसले, श्रीकांत कबुले, विनायक म्हसकर, स्वप्निल खणसे, सुनील यादव, विशाल निश्चित, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, देवा वाघमारे, सूरज शिंदे, दीपाली चव्हाण व स्मिता पाटील यांनी केली आहे.






