
हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, अशातच आता पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. हडपसरमधील एका सोसायटीतील झालेल्या घरफोडीचा छडा पोलिसांनी २४ तासात लावत दागिने चोरुन पसार झालेल्या उत्तर प्रदेशातील चोरट्याला हडपसर परिसरातून अटक केली आहे. फैजल इसरार खान (वय १८, रा. ढकाई, कोशांबी, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हडपसरमधील सम्राट गार्डन सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून सोनसाखळी, कर्णफुले असे साडेतीन लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ जुलै रोजी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. घरफोडी करणारा चोरटा हडपसरमधील माळवाडी भागात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार, महावीर लोंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
हातात रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, खांद्यावर कचरा गोळा करण्याची पोती आणि चेहऱ्यावर निष्पाप भाव…पाहणाऱ्याला त्या केवळ कचरा वेचणाऱ्या महिला वाटाव्यात. मात्र या महिलांच्या हालचालींमागे सुरू होता एक धक्कादायक डाव. बंद घरांची रेकी करून संधी मिळताच घरफोडी करण्याचा उद्योग करणाऱ्या महिलांच्या टोळीचा आळेफाट्यात पर्दाफाश झाला आहे. आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या पाठीमागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरीचा डाव फसला आणि दोन महिलांना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे. ही टोळी परिसरात अनेक दिवसांपासून फिरताना दिसत होती. हातात रिकाम्या बाटल्या आणि कचऱ्याची पोती असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे संशयाने पाहत नव्हते. मात्र बंद घरांवर नजर ठेवून योग्य संधी साधण्याची त्यांची पद्धत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर लोखंडी हत्याराच्या सहाय्याने दरवाजा फोडून चोरी केली जात होती.