
Maharashtra Breaking News Today 17.10.2026
17 Oct 2026 10:01 AM (IST)
स्मार्टफोन आणि टेक कंपनी विवो त्यांच्या V80 सीरीजमधील आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. खरं तर कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारात त्यांचा नवा Vivo V80 स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्याची किंमत बजेट फ्रेंडली सेगमेटंध्ये असणार आहे. कंपनीचा आगामी Vivo V80 FE स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टेंडर्ड (BIS) च्या वेबसाईटवर मॉडेल नंबर V2624 सह स्पॉट करण्यात आला आहे.
17 Oct 2026 09:50 AM (IST)
NMMC Diwali Bonus : नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत भरघोस दिवाळी बोनस जाहीर केला आहे. महापालिकेच्या महासभेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ४५,००० रुपयांच्या सानुग्रह अनुदानास (बोनस) सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट म्हणून थेट ४५,००० रुपयांचा बोनस मिळणार आहे.महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली.
17 Oct 2026 09:37 AM (IST)
कोटा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर २५ हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक मिनीबस (टेम्पो ट्रॅव्हलर) नाल्यात कोसळली. या अपघातात मध्य प्रदेशातील बेतुल येथील आठ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ६ वाजता सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. एसएचओ नंद सिंग यांनी सांगितले की, बस भोपाळहून खाटूश्यामजीकडे जात होती. कराडिया टोलपासून काही किलोमीटर अंतरावर ती एका पुलावरून १५ फूट खाली कोसळली. या अपघातात सतरा प्रवासी जखमी झाले. अनेक जखमींना बेशुद्ध अवस्थेत न्यू मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. त्यांना सीपीआर देण्यात आला. काहींना ऑक्सिजन सपोर्टवरही ठेवण्यात आले.
17 Oct 2026 09:27 AM (IST)
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) महासभेत तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महासभेचे कामकाज पाहायला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) १६ नगरसेवकांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महासभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी नगरसेवकांची बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पत्रकारांनाही अडवण्याचा प्रयत्न: या घटनेचे व्हिडिओ काढत असलेल्या उपस्थित पत्रकारांवरही धावून जात त्यांना मारहाण करण्याचा आणि त्यांचे फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात आला आहे.
Maharashtra to World Breaking News :
सीजेपी (CJP) नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्ली, मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मालेगाव घटिया सुपारी प्रकरणात घोटाळ्याचा ठपका ठेवत एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले.
महाराष्ट्रात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी (सप्तमी) महाकाली आणि कालरात्री देवीच्या दर्शनासाठी राज्यातील प्रमुख शक्तिपीठांवर भाविकांची अलोट गर्दी.
राज्यातील दुष्काळी भागात परतीच्या पावसाने दांडी मारल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची टँकरच्या पाण्यासाठी धडपड सुरू झाली आहे आगामी COP31 परिषदेपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) भारताने हवामान बदलाच्या मुद्यावर विकसित देशांकडून अधिक सहकार्याची आणि समानतेची मागणी केली.