सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराच्या विविध भागांत दुचाकी चोरणाऱ्या उच्चशिक्षित सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीच्या अटकेमुळे वाकड, काळेवाडी, हिंजवडी, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. महादेव शिवानी गरड (वय २७, रा. नवले हॉस्पिटलजवळ, पुणे; मूळ रा. अंबुलगा, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी त्याला १८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह पुणे शहरातील विविध भागांतून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. तपास पथकाने यापूर्वी वाकड परिसरात झालेल्या वाहनचोरीच्या घटनास्थळांची पाहणी केली. घटनास्थळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. त्यासोबत तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.
दरम्यान, संबंधित आरोपी पुन्हा दुचाकी चोरी करण्यासाठी वाकड परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी योग्य ठिकाणी सापळा रचून महादेव गरड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या एकूण ११ दुचाकी जप्त केल्या. आरोपीच्या अटकेमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन, काळेवाडी पोलीस ठाण्यातील चार तसेच हिंजवडी, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक असे एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे करताना आरोपी वेगवेगळ्या परिसरांची निवड करत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पुढील तपास पोलीस हवालदार वंदू गिरे करीत आहेत.
यांनी केली कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, सहायक पोलीस फौजदार दळे, पोलीस हवालदार वंदू गिरे, सचिन गायकवाड, मोहम्मद नदाफ, विजय मोरे, विजय घाडगे, दीपक साबळे, विजय भुसारे, पोलीस शिपाई समाधान कांबळे, कारभारी पालवे, विक्रम भगत, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांनी ही कामगिरी केली.






