संग्रहित फोटो
मारुती बाळासाहेब बनसोडे (वय ३७, रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचे मामा सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४, रा. बोराडेवाडी, डी-मार्टसमोर, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित दशरथ साळुंखे (वय २६, रा. जगतापनगर, थेरगाव), किशोर सुभाष वाघमारे (वय ३९, रा. पवारनगर, थेरगाव), भारत संजय पवार (वय २३, रा. पवारनगर, थेरगाव) आणि किरण अंकुश उमाप (वय २८, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड) यांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साळुंखे याच्या मानलेल्या बहिणीची मारुती बनसोडे यांनी छेड काढल्याचा राग त्याच्या मनात होता. या कारणावरून अमितने आपल्या साथीदारांसोबत संगनमत करून बनसोडे याला मारहाण करण्याचा कट रचला. त्यानुसार बनसोडे याला प्रथम बुलेट दुचाकीवरून आणि त्यानंतर ऑटो रिक्षामधून वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी आणण्यात आले. तेथे आरोपींनी बनसोडे यांच्या डोक्यासह तोंड, गळा, हनुवटी तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली. या मारहाणीत बनसोडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सुरुवातीला आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यातील संबंध तसेच खुनाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर आरोपींची ओळख पटविण्याचे आव्हान होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अमित साळुंखे, किशोर वाघमारे आणि भारत पवार यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर फरार साथीदार किरण उमाप याचाही शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोकरे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
‘या’ पथकाने केली खुनाची उकल
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, सहायक पोलीस निरीक्षक भोकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, सहायक पोलीस फौजदार दळे, पोलीस हवालदार वंदू गिरे, सचिन गायकवाड, मोहम्मद नदाफ, विजय मोरे, हनुमंत कांबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, पोलीस शिपाई समाधान कांबळे, कारभारी पालवे, विक्रम भगत, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.






